मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे गठण झाल्यानंतर आता ख-या अर्थाने कामकाजास गती मिळाली असून, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी चाळणी लावून त्यांचे स्वीय सहायक (पीए) निवडले आहेत, तर मंत्रिमंडळातील १७ मंत्र्यांना अद्याप चांगल्या ‘पीए’चा शोध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला असताना त्यांचे सहकारी मात्र आवडीतील ‘पीए’च्या शोधात होते. अखेर हा शोध संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारी रोजी मंत्र्यांसाठी ‘पीए’ आणि विशेष कार्य अधिका-यांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग १ व वर्ग २ च्या अधिका-यांना आता मंत्र्यांच्या सेवेत ‘ऑन ड्युटी’ तैनात करण्यात आले आहे. असे असले तरी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसह द्यावे लागणार आहे.
कोण कुणाचे पीए?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे, उपमुख्यमंत्री अजित पवार : पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील : उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत भामरे, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा : उपजिल्हाधिकारी महेश शेवाळे, पंकज पाठक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे : अपर जिल्हाधिकारी मंदार वैद्य, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके : उपजिल्हाधिकारी ललीत व-हाडे, डीपीओ मुरलीधर वाडेकर आणि तहसीलदार सुरेश कव्हाळे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे : उपसचिव संतोष गावंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले : एसडीओ सुधाकर भोसले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे : सहसचिव संतोष पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ : उपजिल्हाधिकारी मुकेश भोगे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे : उपसचिव प्रल्हाद रोडे, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट : उपलेखा अधिकारी अभय देशमुख, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक : सहायक आयुक्त शरद खाडे, रोहयो मंत्री भरत गोगावले : अपर सचिव गणेश काथवटे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील : उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील.
१७ मंत्र्यांसाठी पीएंचा शोध सुरू
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड, नितेश राणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिक शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर या १७ मंर्त्यांना पीएचा शोध असणार आहे.
केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए
राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए मिळाले आहेत. यात पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ यांचे भाग्य उजळले. योगेश कदम आणि आशिष जयस्वाल हे पीएविना आहेत.