नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहिरनाम्याचा दुसरा भाग म्हणजेच संकल्प पत्र पार्ट २ जाहीर केले. अनुराग ठाकूर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या संकल्प पत्र १ मध्ये महिलांवर लक्ष्य केंद्रीत केले गेले, तर संकल्प पत्र २ मध्ये इतर काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी संकल्प पत्र २ प्रसिद्ध करताना सांगितले की, गरजू विद्यार्थ्यांसाठी, यूपीएससी आणि राज्य पीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत केली जाईल. गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये अशी मदत केली जात आहे.
दिल्लीतील तरुणांसाठी राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी १५ हजारांची आर्थिक मदत, तंत्रज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना, आयटीआय आणि कौशल्य विकास केंद्र, पॉलिटेक्निकमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये अर्थसहाय्य,
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी भाजप रिक्षा-टॅक्सी कल्याण मंडळ आणि १० लाखांचा जीवन विमा, तसेच ५ लाखांचा अपघात विमा याचप्रमाणे उच्च शिक्षण घेणा-या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्यांच्या विम्यामध्येही सवलत असे प्रमुख मुद्दे भाजपच्या संकल्पपत्र पार्ट-२ मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत.