नवी दिल्ली : केंद्रीय कामगार मंत्रालयाने टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एअरलाइन्स व्यवस्थापन आणि केबिन क्रू सदस्यांमधील काही वादांच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनेक केबिन क्रू मेंबर्सनी प्रवासापूर्वीच्या विश्रांतीच्या काळात रूम शेअरिंगबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्दे आहेत.
याप्रकरणी औद्योगिक विवाद निवारण कायदा १९४७ अंतर्गत कामगार विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी एअर इंडिया एक्स्प्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइन कंपनी एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली होती. प्रवाशांना देण्यात येणा-या सुविधांच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे ही नोटीस आणि दंड ठोठावण्यात आला आहे.