मुंबई : इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्यांनी युवकांना आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. नारायण मूर्तींचे हे वक्तव्य दीर्घकाळ चर्चेत राहिले होते. त्याच्यावर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता नारायण मूर्ती यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की माझा उद्देश कोणालाही जबरदस्तीने अधिक काम करण्यासाठी भाग पाडू नये असा होता. ती गोष्ट आम्ही सल्ला म्हणून किंवा आत्मपरीक्षण म्हणून घ्यायला हवी होती.
नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात तरुण प्रोफेशनल्सना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत करायला पाहिजे असा सल्ला दिला होता. नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्याने अनेक जण नाराज झाले होते. नारायण मूर्ती म्हणाले ते वक्तव्य कामासाठी अधिक दबाव टाकण्याच्या अंगाने पाहिले गेले. आता नारायण मूर्ती यांनी त्यांच्या वक्तव्यावर पुनर्विचार करत म्हटले की कुणालाही दीर्घकाळ काम करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही.
सोमवारी मुंबईत आयोजित किलाचंद स्मृती व्याख्यान कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले मी माझ्या करिअरमध्ये चाळीस वर्षांपर्यंत दर आठवड्याला ७० तासांपेक्षा अधिक काम केले आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ इतर कोणी तसे करावे असा नाही. नारायण मूर्ती पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपली स्थिती आपल्या गरजा यानुसार निर्णय घेतले पाहिजेत.
नारायण मूर्ती पुढे म्हणाले हा काही नियम नाही हा फक्त माझा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमता आणि परिस्थितीनुसार काम केले पाहिजे. नारायण मूर्ती पुढे असेही म्हणाले की कामाच्या तासांपेक्षा आपले काम समाजासाठी किती फायदेशीर आहे हे महत्त्वाचे आहे.
नारायण मूर्ती यांनी या मुद्यावर वाद विवाद करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्यावर जोर दिला. ते म्हणाले जो सल्ला मी दिला होता त्यावर अधिक चर्चा किंवा वादविवाद करण्याची गरज नाही. त्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्ती स्वत:हून विचार करून त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवेल.