बस्तर : वृत्तसंस्था
गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्र प्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगड पोलिस सीआरपीएफने व्यापक मोहीम उघडली आहे. सुरक्षा विभागाकडून नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरडे मोडण्यात येत आहे. छत्तीसगडमधील घनदाट जंगलात ओडिशा सीमेजवळ मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास चकमक सुरू झाली. या कारवाईत १४ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले.
दरम्यान, छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दलाने नक्षलविरोधी मोहीम हाती घेतल्याने धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुठे ना कुठे सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांत धुमश्चक्री सुरू आहे. आज झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. बिजापूर, सुकमा-तेलंगणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले. दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातसुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दोन महिला नक्षलीही ठार
छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. ओडिशा राज्यातील स्टेट कमिटीचा चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास ३० वर्षांपासून नक्षल चळवळीत सहभागी होता. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.