सातारा : प्रतिनिधी
रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साता-याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिला आहे. सातारा- पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून रायगड, नाशिकनंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही राजकीय घमासान सुरू झाले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना साता-याचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साता-याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिला आहे.
साता-याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत.
त्यांना साता-याचे पालकमंत्रिपद देऊन राजधानीचा सन्मान करावा, अशी मागणी कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, विलासकाका उंडाळकर, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांनी आपल्या कामाचा राज्यात ठसा उमटवला. त्यांनी दबावतंत्राचा अन् पदाचा गैरवापर केला नव्हता. त्यांच्याच विचाराचा पालकमंत्री व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे कांचन साळुंखे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यावर शोककळा
सातारा जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व असूनही पालकमंत्रिपद न मिळाल्याने शोककळा पसरली आहे. पालकमंत्रिपदासाठी कोणते निकष लावले गेले हे स्पष्ट करण्याची मागणीही कांचन साळुंखे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अन्यथा आम्हाला उपोषण करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका भाजपाश्रेष्ठींसमोर मांडणार आहोत. उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही कांचन साळुंखे यांनी दिला आहे.