मुंबई : प्रतिनिधी
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या कंपनीला राज्य शासनाच्या महाजनकोकडून कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला. हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचे उल्लंघन आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा, त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी बुधवारी मुंबईत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले.
मी आज पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांना बीडमधील परिस्थिती, दहशत या सगळ्याविषयी सांगितले. मी रश्मी शुक्ला यांना धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपन्यांचा तपशील दिला. धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड, जगमित्र शुगर या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे भागीदार आहेत. अशा कंपन्यांना महाजनको कंत्राट कसे देऊ शकते? महाजनकोकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झाला आहे. आमदार, खासदार अशाप्रकारे त्यांच्या कंपनीसाठी कोणताही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद या नियमाचे उल्लंघन ठरते. यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडा त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते. मी या सगळ्याचा तपशील रश्मी शुक्ला यांना दिला आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात बुधवारी बीड जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. सीआयडीने कोर्टात याप्रकरणाचा प्राथमिक तपास संपल्याचे सांगितले. वाल्मिक कराडला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली? काल वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या मारेक-यांसोबतचा व्हीडीओ समोर आल्यानंतर सखोल चौकशी झाली पाहिजे होती. मग वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.