मुंबई : काँग्रेसच्या वतीने आज राज्य सरकार आणि अदानी समूहाविरोधात जाहीर निषेध मोर्चा सुरू आहे. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये हा मोर्चा सुरू आहे. मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मदर डेअरीच्या जागेवर गार्डन बनवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मदर डेअरची जागा अदानी समूहाला देण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सरकारने अजून ५८ एकर जमीन अदानी समूहाला दिली आहे. अशामध्ये आता कुर्ल्यातल्या मदर डेअरची जागा अदानीच्या घशामध्ये घालण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत काँग्रेसने निषेध केला आहे.
मदर डेअरीमध्ये बोटॅनिकल गार्डन व्हावे हा तेथील स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव डावलून सदर भूखंड अदानीच्या घशात घालण्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कुर्ला नेहरूनगर येथे आंदोलन करण्यात आले. वर्षा गायकवाड यांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मदर डेअरीमध्ये जाण्यापासून वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पोलिस आम्हाला आत सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करणार असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.
कुर्ला नेहरूनगर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ‘लाडक्या मित्रास मोफत भूखंड, जी जमीन शासनाची ती जमीन अदानीची’, अशा आशयाचे पोस्टर यावेळी काँग्रेस आंदोलकांनी झळकावले. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. इथेच बसणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
‘ही जमीन कुर्लेकरांची आहे त्यांना ती मिळाली पाहिजे. इथे गार्डन झालीच पाहिजे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबई पोलिस कुणासाठी काम करतेय, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. अदानींसाठी हे सर्व चालले आहे. हा देश लोकांसाठी आहे की अदानींसाठी आहे असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.