पुणे : प्रतिनिधी
गेल्या वर्षी कांद्यापेक्षा टोमॅटो भाव खाऊन गेला होता. यामध्ये राज्यातील जुन्नर तालुक्यातील शेतक-यांना टोमॅटोला सोन्यासारखा भाव मिळाला होता. अनेक शेतक-यांनी लाखो रुपये कमावले होते. पण यंदा टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दुसरीकडे अनेक जिल्ह्यांतील कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने कापसाला घरात ठेवले आहे. हा कापूस आता काळवंडत असल्याने शेतक-यांच्या जिवाला घोर लागला आहे. शेतक-यांनी सरकारला योग्य मदत करण्याची मागणी केली आहे.
जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतक-यांच्या मेहनतीचा चिखल झाला आहे. उत्तर भारतात सर्वाधिक निर्यात होणा-या टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात होत आहे. गेल्या वर्षी टोमॅटोने शेतक-यांना चांगली कमाई करून दिली होती.
टोमॅटो ५ रुपये किलो
मात्र यंदा टोमॅटोला ५ ते १० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. टोमॅटोचे दर अचानक कोसळल्याने उत्पादन खर्च सोडाच वाहतूक खर्चही मिळत नसल्याने शेतक-यांच्या मेहनतीचा चिखल होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे पीक घेतले. पण आता दर कोसळल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे.