बीड : प्रतिनिधी
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मध्यरात्री वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
मध्यरात्री अचानक वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर पोलिस बंदोबस्तात वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कराडवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. बुधवारी बीड जिल्हा मोक्का विशेष न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. मात्र अचानक रात्री त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.
वाल्मिक कराड याला स्लीप अॅप्निया नावाचा आजार देखील आहे. शिवाय काल वैद्यकीय तपासणी पथकाने तपासणी केली असता, वाल्मिकला सर्दी, ताप आणि खोकला असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे जेल प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इथे वाल्मिकवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
वाल्मिक बीडचा सरपंच संतोष देशमुख खंडणी प्रकणातील आरोपी आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणी आणि मोक्का अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे त्याला १८० दिवस जामीन मिळणार नाही. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. २९ नोव्हेंबर रोजी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता. त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले देखील असल्याचे दिसत होते.
३१ डिसेंबर रोजी वाल्मिकने स्वत: शरणागती पत्करली आणि सीआयडी कार्यालयात गेला. त्यांनंतर बीडमध्ये कराड समर्थकांनी आंदोलन, मोर्चा काढला होता. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक पूर्ण दोषी असल्याचे सिद्ध झाले नाही. मात्र त्यावर आरोप आहेत, या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.