हैदराबाद : वृत्तसंस्था
हैदराबादमध्ये एका पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर गुन्हा लपवण्याच्या हेतूने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून नंतर ते प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. गुरु मूर्ती असे ४५ वर्षीय आरोपीचे नाव असून, तो माजी सैनिक आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) सुरक्षा रक्षक असणा-या आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र अद्याप हे सविस्तरपणे समोर येऊ शकलेले नाही.
३५ वर्षीय वेंकट माधवी आपल्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. १६ जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना पतीवर संशय आला. चौकशी करण्यात आली असता त्याने या भयानक हत्येची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक नागराजू यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी आमच्याकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यासह पतीदेखील पोलिस ठाण्यात आला होता. आम्हाला त्याच्यावर संशय आल्याने चौकशी केली. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गुरु मूर्ती याने पोलिसांकडे कबुली देताना सांगितले की, त्याने बाथरूममध्ये पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर प्रेशर कुकरमध्ये शिजवले. यावेळी त्याने त्यातील हाडं वेगळी काढली. ही हाडे त्याने बारीक केली आणि पुन्हा नंतर शिजवली. सलग तीन दिवस मांस आणि हाडे शिजवल्यानंतर त्याने ते सर्व एका बॅगेत भरले आणि तलावात फेकून दिले. पोलिस आरोपीने दिलेल्या माहितीची पडताळणी करत सत्यता तपासत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी आणि मृत महिलेचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहे. दरम्यान आरोपीने १५ जानेवारी रोजी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केली आणि १६ जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी ही क्रूर घटना उघडकीस आली होती.
दरम्यान बुधवारी रात्रीपर्यंत, मीरपेट येथील तलावात पीडितेच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेष पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे यासाठी पोलिसांनी क्लूज आणि श्वान पथक तैनात केले असल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले.