20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘लालपरी’च्या भाडेवाढीवरून महायुतीत मतभेद

‘लालपरी’च्या भाडेवाढीवरून महायुतीत मतभेद

मुंबई : एसटी संभाव्य भाडेवाढीवरून मंत्रिमंडळातच विसंवाद असल्याचे समोर आले आहे. एकीकडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरच दरवाढीबाबत निर्णय घेऊ असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या भाडेवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे.

मंत्रिमंडळासमोर असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून असा निर्णय आणला जातो. खरंतर दरवर्षी डिझेलच्या आणि सीएनजीच्या किमती वाढत असतात, खर्च दिवसेंदिवस वाढत असतो. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये पाच टक्के जी भाडेवाढ आहे अपरिहार्य असते. यापूर्वी हे चालत आलं होतं. परंतु मध्यंतरी तीन ते चार वर्षांच्या काळात ही भाडेवाढ झाली नाही. कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असू शकतो. तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी येईल तेव्हा त्या विषयावर चर्चा होईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

अजून आमच्यापुढे तशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. महामंडळाच्या एसटीच्या ज्या बसेस आहेत, त्यामध्ये मी, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आम्हा सगळ्यांना चांगल्या बसेस पुरवण्याच्या दृष्टीने कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल. जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस खराब असतील तर लोक म्हणतील कशाची भाडेवाढ करता आहात. त्यामुळे आम्ही चर्चा करू आणि त्यामधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

दरम्यान, संचित तोटा नऊ हजारांवर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रालयात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्यापासून शुक्रवारी सकाळपासूनच एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

या भाडेवाढीनंतर राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी एसटी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती. त्यानंतर आता महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR