ढाका : भारताला विरोध म्हणून काहीही करण्याची तयारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केली आहे. बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करत असल्याने बांगलादेश सरकारशी करार करत सीमेवर कुंपण घालण्यात येत होते. त्याला बांगलादेशने विरोध केला होता. आता ज्या पाकिस्तानच्या जाचापासून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच पाकिस्तानच्या सैन्याला भारताच्या सीमेवर आणण्याचे पाप युनूस करत आहेत.
पाकिस्तानच्या लष्करी अधिका-यांनी नुकताच प्रसिद्ध सिलिगुडी कॉरिडॉरला लागून असलेल्या रंगपूरचा दौरा केला आहे. याच पाकिस्तानी सैन्याने काही दशकांपूर्वी बांगलादेशी नागरिक, महिलांवर अत्याचार केले होते. त्याच पाकिस्तानला हा भारतद्वेष्टा बनलेला बांगलादेश भारताविरोधात कारवाया करण्यासाठी मदत करू लागला आहे. भारताचा हा अत्यंत निमुळता भाग असून पलीकडच्या बाजुला नेपाळ, भूतान आणि या बाजुला बांगलादेश अशी भौगोलिक रचना आहे.
या भागाला चिकन नेक म्हटले जाते. या चिकन नेकवर चीनचा डोळा आहे. सिलिगुडी कॉरिडॉर हा भारतातील पश्चिम बंगालमध्ये स्थित एक अरुंद भूभाग आहे. हा भाग ईशान्येकडील राज्यांना देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. भू-राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा दृष्टिकोनातून हा भूभाग खूप महत्वाचा आहे. या भागाला लागून असलेल्या भागातच बांगलादेशने पाकिस्तानला एन्ट्री दिल्याने भारतासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही राज्ये या भागामुळेच उर्वरित भारताशी जोडलेली आहेत. पाकिस्तानने केलेली ही गुप्त भेट होती. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे चार वरिष्ठ अधिकारी इथे आले होते. बांगलादेश भारताशी संबंध बिघडवून चीनशी मैत्री करत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या लष्करी संबंधांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसेन चीनमध्ये पोहोचले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील परस्पर संबंध मजबूत करणे, द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि बीआरआयच्या प्रगतीला गती देणे यावर करार झाला आहे.