सोलापूर / प्रतिनिधी
शहर पोलिस आयुक्तालयकडून मागील वर्षअखेरीस शहरात मालमत्तेचे ७४५ गुन्हे घडले. त्यापैकी ५२७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घरफोडी, जबरी चोरी, चेन स्रॅचिंग, इतर जबरी चोरी, मोबाईल चोरी, दुचाकी, रिक्षा, सायकल, कार या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. यामध्ये शहर गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करून ३१५ गुन्हे उघडकीस आणले, तर शहरातील सर्व ७ पोलिस ठाण्यांकडून केवळ २१२ गुन्ह्यांची उकल झाली. गुन्हे उघडकीचे हे प्रमाण ७० टक्के असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
शहर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये २ कोटी ४ लाख ४९ हजार ९२० रुपये इतकी मालमत्ता चोरीस गेली होती. त्यापैकी १ कोटी ७८ लाख ४३ हजार ६६४ इतक्या रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यास शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. याशिवाय वर्षभरात खुनाचे ५ गुन्हे कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणून त्यापैकी १ फरारी आरोपी व ४० आरोपींना पकडले. तर २५ गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
वर्षातील ७४५ गुन्ह्यांपैकी मोटारसायकल चोरीचे ३५१ एवढे सर्वाधिक गुन्हे असून त्या खालोखाल दिवसा घरफोडीमध्ये २९, रात्री घरफोडीचे १०२, जबरी चोरीचे ३६, इतर चोरीचे २२७ अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षीरसागर, संदीप पाटील, दादासाहेब मोरे, जीवन निरगुडे, विजय पाटील, श्रीनाथ महाडिक, दत्तात्रय काळे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे यांनी ही कामगिरी पार पाडली. वर्षभरात जेल रोड ३७, जोडभावी ४३, एमआयडीसी ४१, फौजदार चावडी ४०, सदर बझार ४९, विजापूर नाका २०, सलगर वस्ती ११, बाहेरील पोलिस स्टेशन १४ असे २५५ गुन्हे उघडकीस आणले.