कोल्हापूर : विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र, ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. शिवप्रेमींनी ‘छावा’ सिनेमाला विरोध करत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.
‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेला विकी कौशल लेझीम खेळताना आणि नृत्य करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमधील या दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्राही काही शिवप्रेमींकडून घेण्यात आला आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांची संपूर्ण टीम मला मुंबईत भेटली होती. त्यांनी मला हा ट्रेलर दाखवला होता. पण, मी त्यांना सांगितलं होतं की मला संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे.
इतिहासाकारांचं आपण मतं घेऊया. जेणेकरून काही दुरुस्ती असेल ती करून संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा संपर्ू्ण जगभरात पोहोचू शकतो. पण, त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद आलेला नाही. पण, एकंदरीत आपल्याला ट्रेलरमध्ये जे पाहायला मिळत आहे की छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि डान्स करताना दिसत आहेत. पण, लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. आणि लेझीम खेळणे चुकीचे नाही. पण, ते गाण्याच्या स्वरुपात आनंदोत्सव साजरा करत असताना ही सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये सिनेमा काढण्यासाठी १००-२०० कोटी खर्च करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. पण, हे चांगल्या पद्धतीने संपूर्ण जगात पोहोचलं तर कौतुकास्पद आहे. माझी लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे की इतिहासकार आणि या विषयातील जाणकार व्यक्तींसोबत चर्चा करावी.
दरम्यान, ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही सिनेमात वर्णी लागली आहे. लक्ष्मण उटेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.