नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमतीने जुने विक्रम मोडीत काढले आहेत. शनिवारी ‘एमसीएक्स’ वर सोन्याचे दर ८४ हजार पर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी देखील सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. ३१ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ८२,०९० रुपये होती. २२ कॅरेट सोन्याची किंमत ८०,१२० रुपये आणि २० कॅरेट सोन्याची किंमत ७३०६० रुपये प्रति १० ग्रॅम होती.
इंडियन बुलियन ज्वेलर्स वेबसाईटनुसार हे सोन्याचे भाव आहेत. संपूर्ण देशात हे दर एकच असतात. मात्र ही किंमत विना मेकिंग चार्जेस आणि विना जीएसटी असते. देशाच्या विविध भागात मेकिंग चार्जेस देखील वेगळे असतात. १ फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत ८४ हजार रुपयांपर्यंत पोहोचली.
दरम्यान, लग्नसराईच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका बसला. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी हटवली. ज्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली होती.