लातूर : प्रतिनिधी
पैसा आलिशान घर, कार या सोयी सुविधा देऊ शकतात, पण उत्तम आरोग्य, विचार आणि नातेसंबंध देऊ शकत नाही. आपण या सगळ्यापेक्षा वेगळा विचारातून चांगली आर्थिक प्रणाली निर्माण करून आदर्श समाज निर्माण करण्यावर भर द्यावा. प्राध्यापकांनी प्रात्यक्षिकावर भर देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनविषयक अर्थशास्त्राची गुंतागुंत कमी करणे महत्त्वाचे आसल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
दयानंद कला महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४७ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिलकुमार वावरे होते. यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषद अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, समारोप समारंभाचे स्वागताध्यक्ष रमेश बियाणी उपस्थिती होते.
४७ व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन उत्कृष्ट केले गेले. या अधिवेशनातून प्राध्यापक संशोधक व विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानार्जन झाले. मराठी अर्थशास्त्र परिषद ही महाराष्ट्रातील पहिलीच मराठी भाषेचे नाव धारण करणारी परिषद असून त्याचा सर्व संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना अभिमान आहे. आर्थिक परिषदेमधून शिक्षण व आरोग्य यामध्ये समतोल साधून जीवनामध्ये येणारे ताण-तनावातून विजय कसा मिळवायचा हे सर्वसामान्य माणसाला अर्थशास्त्र शिकवण्याचे काम करते, असे सांगून कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले की, व्यक्तींनी जीवनाचा समतोल साधण्यासाठी २४ तासाचे आठ-आठ तासांमध्ये योग्य नियोजन करून आर्थिक गणित सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये पहिले आठ तास अध्यापनासाठी असावेत, पुढील आठ तास हे स्वत:साठी आराम करण्यासाठी व शेवटच्या आठ तासांमध्ये ३ एफ म्हणजेच फॅमिली, फ्रेंड आणि फेथ ३ एच म्हणजेच हेल्थ, हायजेनिक व हॉबीज व ३ एस म्हणजे स्माईल, सोल व सर्विस याच्यासाठी राखून ठेवावे.
यावेळी बियाणी म्हणाले, अर्थशास्त्रासारखा गुंतागुंतीसारखा असणारा विषय प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना व सर्वसामान्याना सोपा करून सांगावा. माणसाच्या जीवनात ज्याप्रमाणे विज्ञान, वाणिज्य महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कला शाखेमध्ये अर्थशास्त्र हे महत्त्वाची आहे. कारण यातूनच समाजाचे, मानवाचे आणि विद्यार्थ्याचे आर्थिक नियोजन करता येईल. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही संकल्पना देऊन सर्वसामान्यांच्या बजेटचा आलेख खालून वर जाणे महत्त्वाचे आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. वावरे यांनी तीन दिवस चाललेल्या परिषदेच्या सर्व चर्चासत्रचा, व्याख्यानाचा आढावा घेतला. या परिषदेसाठी आलेले प्राध्यापक यांनी दयानंद शिक्षण संस्थेविषयी व दयानंद कला महाविद्यालयाविषयी आपला अभिप्राय नोंदवले. या परिषदेच्या समारोप समारंभासाठी डॉ. अविनाश निकम, डॉ.मारुती तेगमपुरे, डॉ. राहुल म्होपरे, डॉ. पी. ए. खडके, प्राचार्य के. के. पाटील, प्रा. डॉ. लक्ष्मण पाटील, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. बालाजी घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.