नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली.
या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेपूर्वी ३२ लाख मते आणि विधानसभेपूर्वी ३९ लाख मते जोडली गेली. ५ महिन्यांत ७ लाख नवीन मतदार ोडले गेले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागवले आहेत. त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. अनेक मतदारांची नावेही हटवण्यात आली आहेत. ही दलित, अल्पसंख्याक मते आहेत. मी कोणतेही आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड आहे का? असा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी संसदेतही माझ्या भाषणात हीच गोष्ट मांडली होती. ५ वर्षात जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा ५ महिन्यात जास्त मतदार जोडले गेल्याचे सांगण्यात आले. हिमाचलच्या मतदार यादी एवढे मतदार यात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. तर निवडणूक आयोगाच्या मते ९.७ कोटी मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात ९ कोटी ५४ लाख लोकसंख्या असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी ३९ लाख मतदान वाढले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला नाव आणि पत्त्यासह मतदार यादी हवी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या पौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रामध्ये आमची मतदानाची संख्या कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली तेवढीच मते आम्हाला विधानसभा निवडणुकीत देखील मिळाली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची जी संख्या वाढली तेवढेच मते ही भारतीय जनता पक्षाची वाढली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यात आमची मते कमी झालेली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
संसदेत देखील केली होती मागणी
काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर या आधी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके ५ वर्षांत मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या ५ महिन्यात जोडले गेले असे म्हणत राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांवर भाष्य केले होते. ते म्हणाले, शिर्डीच्या एका इमारतीमध्ये ७ हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी, नाव आणि पत्ते मागितले आहेत. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. तसेच निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती. सरन्यायाधीशांना कमिटीमधून का हटवण्यात आले?, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित होता.