नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर उमेदवारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला. केजरीवाल यांनी दावा केला की, त्यांच्या आमदारांना आणि उमेदवारांना फोनवरून प्रत्येकी १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी एसीबीचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहचून चौकशी केली.
केजरीवाल यांच्या आरोपांनंतर, भाजपने उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर, एलजींनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार, एसीबीचे पथक केजरीवाल, खासदार संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले. एसीबीच्या पथकाने केजरीवाल यांच्या घराची सुमारे दीड तास चौकशी केली. चौकशीनंतर, पथकाने केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस दिली आणि तेथून निघून गेले.
६ फेब्रुवारी रोजी ३ एजन्सींचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर केजरीवाल यांनी हे आरोप केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ५ फेब्रुवारी रोजी ७० जागांसाठी ६०.५४% मतदान झाले. निकाल ८ फेब्रुवारी रोजी येतील.