पुणे : राज्यात साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, आतापर्यंत सुमारे ६१ लाख टन साखर उत्पादन झाले असून, राज्यातील १४ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. आतापर्यंत सर्वाधिक १७ लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाली असून पुणे विभागात १४ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली आहे. यंदा राज्यात ८५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरला सुरू होणे अपेक्षित असताना विधानसभा निवडणूक व त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे हंगामास तुलनेने महिनाभराचा उशीर झाला. तरीदेखील पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, साखर कारखान्यांना या उसाचे गाळप तातडीने करावे लागत आहे. त्यासोबत सरासरी साखर उतारादेखील कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळेच एकूण साखर उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षाही कमी होईल, असे मत साखर तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
राज्यात यंदा ९९ सहकारी, तर १०१ खासगी कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत ६६ लाख ७६ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ६० लाख ९६ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी साखर उतारा ९.१३ टक्के मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत राज्यात ७४ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ७२ लाख ६७ हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी सरासरी साखरेचा उतारा ९.७ टक्के मिळाला होता. पावसाचे अतिप्रमाण आणि उसाला आलेल्या तु-यांमुळे सोलापूर विभागातील बारा कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागातील दोन कारखान्यांनीदेखील धुराडी बंद केली असून यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर गाळप हंगाम लवकर संपेल, अशी शक्यता साखर तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
विभागनिहाय उत्पादन व साखर उतारा
कोल्हापूर १७.६५–१०.७९
पुणे १४.३१–९.१८
सोलापूर ९.०९–७.९२
अहिल्यानगर ७.३३–८.५६
संभाजीनगर ४.७३–७.६
नांदेड ७.०८–९.३५
अमरावती ०.६–८.६
नागपूर ०.१०–५.२३
एकूण ६०.९६–९.१३