लातूर : प्रतिनिधी
शहरातील रिंग रोड परिसरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये उस्ताद तहारी अॅन्ड बिर्याणी हॉटेल समोर झोपलेल्या अंदाजे ४० वर्षे वयाच्या पुरुषाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. लातूर शहरातील बाभळगाव चौक गोजमगुंडे मळा दरम्यानच्या रिंग रोडवर उस्ताद तहारी अॅन्ड बिर्याणी हॉटेल समोर झोपलेल्या इसमाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याचे निदर्शनास येत आहे.
साधारणता ४० वर्षे वयाचा हा इसम आहे. गुरूवारी रात्री बाराच्या नंतर ते शुक्रवारी पहाटे पाचच्यादरम्यान हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयताजवळ त्याची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. नेमका हा खून कोणी केला? काय कारणासाठी केला? हे अद्यापही लक्षात येत नाही, ओळख पटल्यानंतर या खूनामागचे धागेदोरे हाती लागू शकतील, असा अंदाज आहे. या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत
आहेत.