पंढरपूर /प्रतिनिधी
भूवैकुंठ पंढरीनगरीत श्री विठ्ठलाच्या माघवारी जया एकादशीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. माघवारी जया एकादशीनिमित्त पंढरीत सुमारे ४ लाख भाविक दाखल झाले होते.
जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्निक झाली. या वेळी आमदार तुकाराम काते, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, मंदिर समितीच्या सदस्या अॅड. माधवी निगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, शंकर पटवारी, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते
दिवसभरात रांगेतील भाविकांनी पदस्पर्श दर्शन तसेच काहींनी मुखदर्शन आणि कळस दर्शन घेतले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सुमारे ४ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. श्री विठ्ठलाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरीनगरी भक्तिमय झाली आहे.
जया एकादशी माघवारी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविक दाखल झाल्याने विठुरायाची अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
विठ्ठल भक्तांनी या माघवारीसाठी पंढरीत लक्षणीय गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा निनाद, आकाशाला गवसणी घालणारा ज्ञानबा-तुकारामाचा नामजप, डोलाने फडकणा-या भगव्या पताका अशा वातावरणात वारकरी विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झाल्याचा पहावयास मिळाला. यामुळे विठुनामाच्या गजराने सारी पंढरीनगरी भक्तिमय झाली होती.