मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीत एका राज्यात म्हणजे तेलंगणात काँग्रेसला विजय मिळाला असून त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावाही पक्षाने केला आहे. पण तेलंगणाच्या विजयात महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचेही योगदान आहे. तेलंगणामध्ये त्यांनी केलेल्या मेहनतीची दखल घेऊन काँग्रेसच्या वतीने त्यांना आता मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माणिकराव ठाकरे हे गेल्या एका वर्षापासून तेलंगणामध्ये काम करत होते. त्यामुळे माणिकराव ठाकरेंना त्या ठिकाणची सर्व परिस्थिती माहिती होती. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. त्यामुळे तेलंगणाच्या विजयामध्ये त्यांचा मोठा वाटा मानला जातो. तेलंगणामध्ये काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केला असून दहा वर्षांनंतर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तेलंगणातील विजयानंतर आता महाराष्ट्रातल्या माणिकराव ठाकरेंना अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माणिकराव ठाकरे हे सध्या दिल्लीत पोहोचले असून डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत त्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत तेलंगणाच्या संदर्भात चर्चा होणार असली तरी माणिकराव ठाकरे यांच्या जबाबदारी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
माणिकराव ठाकरे राजकारणापासून दूर होते
माणिकराव ठाकरे हे एकेकाळी महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. पण मधल्या काळात ते राजकारणापासून दूर झाले होते, राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र आता तेलंगणाच्या निवडणुकीनंतर, माणिकराव ठाकरे हे पुन्हा सक्रिय होणार असून त्यांना मोठी जबाबदारीही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्य काँग्रेसमधील एखादे मोठे पदही त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.