मोर्शी : प्रतिनिधी
अप्पर वर्धा धरणानजीक जोलवाडी रस्त्यावर एका ३० वर्षीय तरुणाचा शरीरापासून डोके नसलेला मृतदेह शनिवारी (दि. ८) सकाळी दहाच्या सुमारास आढळला. दुर्गादास पांडुरंग नेहारे (रा. मायवाडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.
मोर्शीपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मायवाडी येथील दुर्गादास पांडुरंग नेहारे हा ६ जानेवारीपासून बेपत्ता होता. याची फिर्याद मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दुर्गादास हा जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश प्राप्त झाले नाही. ८ फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या जोलवाडी शिवारातील वनविभागाच्या जंगलात त्याचा मृतदेह शरीरापासून डोके व हात अलग अशा अवस्थेत आढळून आला.
जंगलात काम करण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांना हा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशात त्यांना आधार कार्ड दिसून आले. त्यावरून त्याची ओळख पटली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती आष्टी पोलिस स्टेशनला दिली.
मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार नितीन देशमुख, स्कॉड पोलिस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आष्टी पोलिसांनी पंचनामा करून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली आहे.