परभणी : सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा पोलिस दलातील एक पोलिस अधिकारी व ३ पोलिस अंमलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान यापुर्वी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंंबित करण्यात आले आहे. दरम्यान लाँग मार्चमध्ये सहभागी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पथक त्यांच्याजवळ पोहोचले असल्याची माहिती आहे.
निलंबीत करण्यात आलेल्यात परभणी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यातील फौजदार कार्तिकेश्वर तुरनर, पोलिस अंंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण व राजेश जटाळ यांंच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर दुस-या दिवशी पुकारलेल्या बंद दरम्यान परभणी शहरात जाळपोळ व दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी गुन्हे दाखल करून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते.
या दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. तसेच लोकनेते विजय वाकोडे यांचाही हृदय विकाराने मृत्यू झाला. दोन्ही पिडीत कुटूंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने न्यायासाठी परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढण्यात आला. सध्या हा लाँगमार्च नाशिकजवळ आहे. याच दरम्यान १ फौजदार व ३ पोलिस अंंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.