नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. चिप बसवलेली कोणतेही मशीन हॅक होऊ शकते, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला आहे. २००३ पासून ईव्हीएम मशीनला विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिग्विजय सिंह म्हणाले की, चीप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाला विरोध करत आहे. आम्ही भारतीय लोकशाहीला व्यावसायिक हॅकर्सद्वारे नियंत्रित करू देऊ का? हा मूलभूत प्रश्न आहे, जो सर्व राजकीय नेते विचारत आहेत. पक्षांना हे करावे लागेल. माननीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, तुम्ही आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का? असे ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने १६३ जागा जिंकल्या तर काँग्रेसने ६६ जागा जिंकल्या आणि भारत आदिवासी पक्षाने एक जागा जिंकली आहे.
पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांची तुलना करताना ते म्हणाले की, पोस्टल बॅलेटद्वारे काँग्रेसला मतदान करणाऱ्या आणि आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व मतदारांचे आभार! पोस्टल बॅलेटवर काँग्रेस १९९ जागांवर आघाडीवर आहे. तर यापैकी बहुतांश जागांवर, आम्हाला ईव्हीएम मतमोजणीवर मतदारांचा पूर्ण विश्वास मिळवता आला नाही. असेही म्हणता येईल की जेव्हा व्यवस्था जिंकते तेंव्हा जनतेचा पराभव होतो.