25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्र...तर वाल्मीक कराडलाही माफ करा

…तर वाल्मीक कराडलाही माफ करा

जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारेंचा धस यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई काढण्यात आलेला लॉन्ग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा लॉन्ग मार्च थांबवण्यात आला. यावरून आता राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.

सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले होते. सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी दलित संघटनांनी परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. परंतु, नाशिकमध्ये हा मार्च स्थगित करण्यात आला.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा नाशिकमधून माघारी फिरला. यावरुन आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. …तर वाल्मीक कराडलाही माफ करावे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्या जाऊ द्या त्याला माफ करा या भाषणाचा एक व्हीडीओ पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

दुस-याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिस-याने येऊन, जाऊ द्या, त्याला माफ करा हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणा-यास कळू नये याला काय म्हणावे. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मीक कराडलाही माफ करावे, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

तिघांच्याही खुनाला माफी नाही
सोमनाथ सूर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणा-यांना माफ करावे, ही भावनाच मुळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो आणि खुनाला माफी नाही. हा खूनच आहे. अक्षय शिंदेचा खूनच आहे, सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

सोमनाथला पुन्हा जिवंत करा
सोमनाथला पुन्हा जिवंत करा, फिट्टमफाट हिशोब होईल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंर्त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सुरेश धस सांगतात…तसे चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलिस अधिका-यांना मोठ्या मनाने माफ करु…धस साहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा…फिट्टमफाट हिशोब होईल असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

परभणी प्रकरणात धसांची लुडबूड नको
ज्या पोलिसांनी आमच्या सुशिक्षित भीमसैनिकांना जबर मारहाण केली, त्या पोलिसांची बाजू भाजप आमदार सुरेश धस घेत आहात का? असा सवालही खरात यांनी केला. त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंबेडकरी जनता आणि आंबेडकर नेते खंबीर आहोत, असेही सचिन खरात म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR