जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जयपूर पोलीस आयुक्तांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमीही झाले आहेत. सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर श्यामनगर परिसरात त्यांच्या घरामध्ये घुसून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आले. सुखदेव सिंह यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासनामध्ये खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांबरोबरच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, गोळीबार करण्यासाठी आलेल्या एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळी कुठे लागली याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र हा गोळीबार श्यामनगरजवळच्या त्यांच्या निवासस्थानाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर मेट्रो मास रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुखदेव सिंह यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. मात्र हा गोळीबार कुणी केला, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
सुखदेव सिंह गोगामेडी दीर्घकाळापासून राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित आहेत. त्यांनी करणी सेनेच्या संघटनेत झालेल्या वादानंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. गोगामेडी हे तिचे अध्यक्ष आहेत. ते पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काऊंटर केसनंतर राजस्थानात झालेल्या आंदोलनामुळे चर्चेत आले होते.