नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२५ मधील आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केली. यामध्ये जीडीपी, विकास दर आणि कर्जाच्या आधारावर त्या देशामधील परिस्थिती मांडण्यात आली. अर्थात अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कायम आहे. परंतु भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. मागील पाच वर्षांत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग सर्वाधिक राहिला आहे. चीनवर कर्ज वाढले आहे. कॅनडा, जर्मनी आणि इटलीने कर्ज कमी करण्यात यश मिळवले. जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण दिसून आली आहे. हे विश्लेषण २०२० ते २०२५ दरम्यानच्या आकडेवारीवर आधारीत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, सन २०२५ मध्ये अमेरिकेचा जीडीपी ३०.३ ट्रिलियन डॉलर राहण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये हा २१.४ ट्रिलियन डॉलर होता. म्हणजेच गेल्या ५ वर्षांत अमेरिकेचा जीडीपी ४२% वाढला आहे. सरकारचा खर्च जास्त होत असतानाही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे.
चीनची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये १९.५ ट्रिलियन डॉलर असण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ही १४.९ ट्रिलियन डॉलर होती. म्हणजे मागील ५ वर्षांत चीनच्या अर्थव्यवस्थेत वाढ ३१% टक्के राहिली. परंतु चीनचे कर्ज-जीडीपी प्रमाण ७०% वरुन वाढून ९४% टक्के झाला आहे. यामुळे वाढलेले कर्ज चीनसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत स्थिर वाढ दिसत आहे. जर्मनीचा जीडीपी २०२५ मध्ये $४.९ ट्रिलियन असण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये $३.९ ट्रिलियन होता. जर्मनीचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर ६८% वरून ६२% पर्यंत घसरले आहे. हे कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाचे लक्षण आहे.
जगभरात भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ४.३ ट्रिलियन डॉलर होण्याचा अंदाज आहे. २०२० मध्ये २.७ ट्रिलियन डॉलर होता. म्हणजेच २०२० च्या तुलनेत आता भारताच्या अर्थव्यवस्थामध्ये ६०% वाढ झाली आहे. दुसरीकडे कर्ज जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे. ते ८८% वरुन ८३% वर आल्यामुळे भारताचे आर्थिक नियोजन चांगले होत असल्याचे दिसून येत आहे.
बाझीलची जोरदार कामगिरी, जपान घसरला
ब्राझीलचा जीडीपी २०२० मध्ये $१.५ ट्रिलियन होता. तो आता २०२५ मध्ये $२.३ ट्रिलियन असण्याचा अंदाज आहे. म्हणजेच ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेची वाढ ५६% झाली आहे. कर्जाचे प्रमाण ९६% वरून ९२% पर्यंत कमी केले आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. २०२५ मध्ये जपानचा जीडीपी ४.४ ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे. तो २०२० मध्ये ५.१ ट्रिलियन डॉलर होता. ही घसरण १३% आहे.