सोलापूर : प्रतिनिधी
घरच्या गरिबीला जबाबदार धरत कष्टाला व प्रयत्नाला फाटा देणारे अनेक तरुण, तरुणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सोलापूरच्या संजीवनी व सरोजिनी भोजने या सख्ख्या बहिणींनी जिद्दीच्या जोरावर गरिबी परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या दोन भगिनींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मरिआई चौकातील गवळी वस्ती भागात ज्योतीराम भोजने हे आपल्या परिवारासह केवळ ८ पत्र्यांच्या खोलीत राहतात. त्यांनाही गरिबीमुळे आपले शिक्षण पाचवीनंतर सोडून द्यावे लागले. मात्र, नंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी मेकॅनिकचा व्यवसाय स्वीकारला. त्या व्यवसायात होणा-या तुटपुंज्या कमाईवर आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा ७ जणांचा संसार ते चालवतात. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. मात्र, मुलगा कामी आला. मुलाला हाताशी धरून ते त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. त्यातच गरिबी परिस्थितीवर मात करीत त्यांच्या दोन मुलींनी बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरुवात केली. ७ वर्षांच्या कालावधीत ३ वर्षे कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली. परंतु त्यांनी त्यांचा अभ्यास व परीक्षा देणे चालूच ठेवले. तब्बल ६ वेळा परीक्षा देऊनही केवळ काही पॉईंटने त्यांचा नंबर हुकला.
तथापि, त्यांनी जिद्द सोडली नाही. दोन्ही बहिणींनी एकमेकीला मैत्रिणीप्रमाणे प्रोत्साहन देत अभ्यास चालूच ठेवला. त्यांच्या जिद्दीपुढे वडिलांचेही त्यांना अभ्यास थांबवा असे म्हणण्याचे धाडस झाले नाही. सुदैवाने सख्खा भाऊ श्रीधर व मावसभाऊ प्रशांत बचुटे यांची आर्थिक मदत मिळत राहिली. वडिलांचे मित्र ब्रम्हदेव खटके यांनीही कोरोना काळात त्यांच्या घराच्या खोल्या अभ्यासासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या. आई रेश्मा व आजी तारामती यांनीही मुलींना काम न लावता अभ्यासासाठी पाठबळ दिले. अखेर स्वामी समर्थांचे भक्त दोघी बहिणींच्या कष्टाला माघ पौर्णिमेच्या आदल्या मंगळवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री फळ मिळाले. कारण एमपीएससी परीक्षेत दोघी बहिणी उत्तीर्ण झाल्या. अनेकांच्या सहकार्याने यशाचा मार्ग सुकर झाला अशी भावना दोघी बहिणी बोलून दाखवतात.