मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू झहीर खानने पत्नी सागरिका घाटगे आणि मेव्हणा शिवजित घाटगेसह मुंबईत २६०० स्क्वेअर फूट लग्झरी अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केले आहे. मायानगरी मुंबईतल्या लोअर परेल येथे असलेल्या आलिशान घराची किंमत जवळपास ११ कोटी इतकी आहे. रिअल इस्टेट सल्लागार स्क्वायर यार्डस् यांनी त्याबाबत माहिती दिली असून फेब्रुवारी २०२५ मध्ये या घराची नोंदणी करण्यात आली आहे.
माहितीनुसार, ही संपत्ती इंडिया बुल्स स्काय येथे आहे जी इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट लिमिटेडकडून विकसित करण्यात आली आहे. या घराचा कार्पेट एरिया २१५८ स्क्वेअर फूट तर बिल्डअप एरिया २५९० स्क्वेअर फूट आहे. त्याशिवाय घराला ३ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे.
या मालमत्तेच्या खरेदीसाठी झहीर खान जोडप्याला ६६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागले आहे. रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण रेरानुसार, इंडिया बुल्स स्काय ३ एकरमध्ये पसरलेला असून ‘रेडी टू मूव्ह इन’ रहिवासी संकुल आहे. दक्षिण मुंबईतील लोअर परेळ हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. लोअर परेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ यांच्यामधील अंतर १८ कि.मी. आहे. लोअर परेल हा परिसर उच्चभ्रू मानला जातो, त्याठिकाणी निवासी आणि व्यावसायिक इमारती आहेत. तिथे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे ऑफिसही आहे.
दरम्यान, आयपीएल २०२५ च्या आधी झहीर खानला लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा मेंटॉर बनवले आहे. झहीर खान याआधी २०२२ मध्ये गौतम गंभीर या टीमचा मेंटॉर होता. झहीर खान याने भारतासाठी ९२ कसोटी, २०० वनडे आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत. झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत २०१७ साली लग्न केले आहे.