नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना ट्विटरवरून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली असल्याचे मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. याच वेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि शिवाजी महाराजांच्या शौर्य, न्याय आणि समर्पणाचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि मुघल शासकांविरुद्ध युद्धे लढली. त्यांच्या शौर्याची गाथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांचे शौर्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रेरणास्रोत मानले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.