प्रतिनिधी / सोलापूर
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर बस स्थानकावर त्यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत सोलापूर एसटी विभागाचे विभाग नियंत्रण गोंजारी तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. बस स्थानक परिसरात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
दरम्यान, परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्थानकप्रमुख कक्षात सोलापूर बसस्थानक परिसरास धावती भेट देऊन प्रस्तावित असलेल्या बसस्थानकाच्या आराखड्याची माहिती घेतली.यावेळी आमदार विजय देशमुख, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, आगारप्रमुख उत्तम जुंदले, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आदींसह अधिकारी यांची उपस्थिती होती.
सोलापूर बसस्थानक परिसर, वाहनतळ, सुलभ शौचालय आदींची पाहणी केली. तदनंतर सोलापूर बसस्थानकाच्या प्रस्तावित असलेल्या आराखड्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध संघटनेचे निवेदन स्विकारले. त्यानंतर सरनाईक यांनी सोलापूर धाराशिव या नवीन बसमधून धाराशिव जिल्ह्याकडे प्रस्थान ठेवले. नवीन बसेसची पाहणी यावेळी त्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांना व्यस्त वेळापत्रकामुळे प्रसार माध्यमांशी संवाद सधता आला नाही. सोलापूरच्या प्रस्तावित नवीन बस स्थानकाच्या आराखड्याविषयी माहिती मागून घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मंत्री सरनाईक यांचे आगमन निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने झाले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मंत्री येणार असल्याने बस स्थानकाचे वाहनतळ आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे एसटी बसेस उभारण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्याचप्रमाणे एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी देखील मंत्र्यांची वाट पाहत ताटकळत उभे होते.
संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे मंत्री येती घरा तोची दिवाळी दसरा असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. परिवहन मंत्री सोलापूर बसस्थानकास भेट देणार आहेत. असे सांगण्यात आल्यानंतर सोलापूर एसटी विभाग स्वच्छतेसाठी सकाळपासूनच तयार असल्याचे दिसून आले. परिवहन मंत्री येण्यापूर्वी वाहनतळ परिसर स्वच्छ आणि दुर्गंधमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र हेच प्रयत्न वर्षातील बाराही महिने होत नाहीत.