बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, यासाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग इथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करत ग्रामस्थांच्या भावना त्यांना सांगितल्या.
फोनवर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिका-यांनी सकारात्मकता दाखवल्याचं पाटील यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले, मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. हा खूप संवेदनशील विषय आहे. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलिस अधिका-यांना देखील सहआरोपी करा.
फरार कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. बाकीच्या आरोपींचा सीडीआर काढण्यात यावा अशा प्रमुख मागण्या देशमुख कुटुंबाच्या आणि ग्रामस्थांच्या मागण्या आहेत असे त्यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.
शिवाय यावेळी त्यांनी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली. त्या पोलिस अधिका-याला सहआरोपी केले नाही. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना देखील सहआरोपी करा त्यांनीच हे आंदोलन दडपले होते.
तसेच पोलिसांकडून कारवाई होत नसून चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असून धनंजय मुंडे देखील यात आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. शिवाय मुंडेंना टोळ्या सांभाळण्याचा नाद असून यातील आरोपी त्यांचेच आहेत, त्यामुळे त्यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी जरांगे यांनी केली.