नवी दिल्ली : विनायक कुलकर्णी
भव्य शोभा यात्रा, माय मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणा-या लोक कलाकारांच्या सादरीकरणाने दिल्ली दुमदुमली. ग्रंथदिंडीच्या दिमाखदार सोहळ््याने प्रारंभ आणि मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सरहद आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा) येथे आयोजन करण्यात आले आहे. सरस्वतीचे चिन्ह, वीणा यांची प्रतिकृती तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिकांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती, छायाचित्रे अशा सांस्कृतिक ठेव्यातून अभिजात मराठी भाषेची गुढी उभारण्यात आली होती.

अंबारीच्या चित्ररथातून ही दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, आदिवासी नृत्य, लेझीम पथक, विविध वेशभूषेत सहभागी झालेले रसिक यांचा या शोभायात्रेत विशेष सहभाग होता. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पारंपरिक मराठी वेशभूषेतील स्त्री-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. चित्ररथाची संकल्पना महाराष्ट्र शासनाची होती.
पंचक्रोशी मावळ हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या घोरावडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडीने टाळ, मृदंग, वीणेसह धरलेल्या तालावर साहित्यप्रेमी दंग झाले. दिंडीपुढे डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मराठी संस्कृतीची ओळख दर्शविताना फुगडीचा फेर धरला तर कल्याणच्या लेझिम पथकाने बहारदार लेझिम सादर केले. युवक-युवतींनी नृत्य केले.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करणा-या टोप्या घालून सीमा भागातील मराठी बांधव साहित्य ग्रंथदिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दिल्लीतील रसिकांनी ढोल-ताशा वादन तसेच गोंधळींच्या सादरीकरणाच्या तालावर केलेले भांगडा नृत्य विशेष आकर्षण ठरले. दिल्लीच्या प्रशस्त मार्गांवरून निघालेला हा पालखी सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले.