तिरुअनंतपुरम : केरळमधील ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थना सभेत एकापाठोपाठ अनेक स्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. सर्वपक्षीय बैठकीत अनेक ठराव पारित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, सचिवालय संकुलातील कॉन्फरन्स ऑडिटोरियममध्ये ही सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बिनबुडाचे आरोप करणे, अटकळ आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याची विनंती करण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.
निवेदनानुसार, सर्वपक्षीय बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी हजेरी लावली होती आणि त्यांनी असा निर्धारही केला की, केरळ त्या सर्व शक्तींवर नियंत्रण प्राप्त करेल ज्यांना राज्यात अराजकता माजवायची आहे. राज्यातील शांतता, बंधुता आणि समता या विशेष सामाजिक स्थितीला असे लोक सहन करू शकत नाहीत. केरळमधील कोचीजवळील कलामसेरी येथे रविवारी ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थना सभेत झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कॉन्फरन्स सेंटरमध्ये ‘यहोवाचे साक्षीदार’ गटाची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या ख्रिश्चन धार्मिक गटाची स्थापना १९व्या शतकात अमेरिकेत झाली होती.