पुणे : प्रतिनिधी
एकवेळ लसणाचे दर गगनाला भिडत ५०० रुपये किलो झाले होते, मात्र मागील काही दिवसांपासून लसणाच्या दरात घसरण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या बाजारात लसणाच्या दरात चारशे रुपयांची घसरण होऊन बाजारात हे दर १०० ते १२० रुपयांवर गेले आहेत. तर बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बाराही महिने टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. हा टोमॅटो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. टोमॅटोवर मोठा भांडवली खर्च करून उत्पादन घेतले जाते. मात्र आता उत्पादन खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला मिळणारा बाजारभाव ४० टक्क्यांनी तोट्यात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी टोमॅटोवर करण्यात आलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे.
दोनशे रुपयांपर्यंत घसरण
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला ५०० ते ६०० रुपयांचा बाजारभाव मिळत होता. आता अगदी हे दर १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. त्यामुळे शेतक-यांचा टोमॅटो तोडणीचा व वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटोच्या दरात आणखी घसरण झाल्यास टोमॅटो फेकण्याची वेळ शेतक-यांवर येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात लसणाचे भाव वधारल्याने लसूण बाजारात साडेपाचशे रुपये किलो दराने विकला जात होता. मात्र सद्य स्थितीत लसणाचे भाव १२० रुपये किलो एवढे असल्याने लसणाची ठसण उतरली आहे. लसूण साडेपाचशे रुपये किलोपर्यंत तडकला होता. आता नवीन लसूण बाजारात आल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे किरकोळ भावात लसूण १२० रुपये प्रति किलो विकला जात आहे.