नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमध्येन्यायालयाने फसवणूक प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षे कारावसाची शिक्षा ठोठावल्याने त्यांचे पद धोक्यात आले होते. याप्रकरणी कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केल्यानंतर आज झालेल्या सुनावणीनंतर जिल्हा सत्र न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अपीलचा कालावधी असेपर्यंत माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद कायम राहणार आहे. त्यामुळे आमदारकीसह मंत्रिपद धोक्यात आलेल्या कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात १९९७ मध्ये मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार १० टक्के कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे कोणतीही मिळकत नसल्याची खोटी माहिती दिली. तसंच अन्य दोन लाभार्थ्यांच्या देखील सदनिका घेतल्या आणि अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
त्यानंतर गेल्या गुरुवारी न्यायालयात त्यावर अंतिम सुनावणी होऊन निकाल लागला. या खटल्यात कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांना दोन वर्षे कारावासाची तसेच ५० हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा झाली होती. दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांचे पद धोक्यात आल्याचे बोलले जात होते. शिक्षेला स्थगिती मिळवल्यासच त्यांचे पद वाचू शकणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाने माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे.