पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची वाटचाल गुन्हेगारीचे माहेरघर, अशी होत चालली होती. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. यातच शिवजयंतीला कोथरूडमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याला कुख्यात गुंड गजा मारणेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांना खडसावले होते. यानंतर आता जागे झालेल्या पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली असून गुंड गजा मारणेसह चौघांवर मकोका दाखल करून गजा मारणेला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कोथरूड येथे देवेंद्र जोग या भाजपच्या कार्यकर्त्याला ‘बघितले म्हणून’ कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गजा मारणेचा भाचा बाबू पवार, विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ यांच्याविरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गजा मारणेचा भाचा हा फरार आहे. या चौघांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.