बीड : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी प्रशासनाकडे एकूण ९ मागण्यांचे निवेदन देऊनही आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे न्याय मिळेपर्यंत, महिला व गावक-यांच्या सहभागाने देशमुख कुटुंबीय मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून महादेव मंदिरासमोरील प्रांगणात सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येपूर्वी तीन दिवस केज पोलिस सतर्क राहिले असतें तर ही हत्या झाली नसती. विविध ९ मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अन्नत्याग आंदोलन स्थळाला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे, आ. संदीप क्षीरसागर, रमेशराव आडसकर, हभप भागचंद्र झांजे, रिपाईचे (खरात )सचिन खरात यांनी भेट देऊन पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान, आंदोलन स्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा येथील डॉ. मुळे यांच्यासह आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. परंतु, धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विरोध दर्शवीत तपासणी करण्याचे नाकारले.
पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी मस्साजोग बस थांब्यासह, आंदोलन स्थळी पोलिस बंदोबस्त कडक ठेवला असून प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे व मंडळ अधिकारी डी एम मस्के यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गावाक-यांशी चर्चा केली. एसआयटी आणि सीआयडी तपास अधिकारी गावाक-यांना मागण्या संदर्भात लेखी आश्वासन देण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. याप्रकारणाचा अहवाल वरिष्ठाना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
गावक-यांचे न्यायासाठी चौथे आंदोलन
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी गावक-यांची एकी आहे. ग्रामस्थांनी सुरुवातीला मस्साजोग येथील राष्ट्रीय महामार्गांवर १४ तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर महिलांसह तलावात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन, जलकुंभावर चढून आंदोलन आणि आता सामूहिक अन्नत्याग आंदोलन हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी करण्यात येणारे चौथे आंदोलन आहे.