22.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रमस्साजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

मस्साजोग ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आज ७८ दिवस झाले. मात्र, अद्याप या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला अटक झालेली नाही. त्यामुळे आंधळेच्या अटकेच्या मागणीसह एकूण ९ मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे दिले असून, या मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून महादेव मंदिरासमोरील प्रांगणात बेमुदत सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी बारावीची परीक्षा सुरू असताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवीही अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाली आहे. रास्ता रोको, जलसमाधी, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करूनही देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. त्यामुळे संतप्त मस्साजोग ग्रामस्थांनी आता बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला असून, आजपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुर केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.

तसेच या गुन्ह्यातील आरोपींना मदत करणा-यांचे पुरावे उपलब्ध होऊनही अद्याप सहआरोपी करण्यात आले नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. सरपंच संतोष देशमुख हत्येपूर्वी तीन दिवस केज पोलिस सतर्क राहिले असते तर ही हत्या झाली नसती, अशा शब्दांत देशमुख कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.

अन्नत्याग आंदोलन स्थळाला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे, आ. संदीप क्षीरसागर, रमेशराव आडसकर, हभप भागचंद्र झांजे, रिपाइंचे (खरात) सचिन खरात यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी मस्साजोग बस थांब्यासह आंदोलन स्थळी पोलिस बंदोबस्त कडक ठेवला असून प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे व मंडळ अधिकारी डी एम मस्के यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गावाक-यांशी चर्चा केली. एसआयटी आणि सीआयडी तपास अधिकारी गावाक-यांना मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठाना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

धनंजय देशमुख वैभवीचा वैद्यकीय तपासणीला विरोध
आंदोलन स्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र, विडा येथील डॉ. मुळे यांच्यासह आरोग्य पथक तैनात करण्यात आले. परंतु धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विरोध दर्शवीत तपासणी करण्याचे नाकारले.

ग्रामस्थांचे न्यायासाठी चौथे आंदोलन
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी गावक-यांची एकी आहे. ग्रामस्थांनी सुरुवातीला मस्साजोग येथील राष्ट्रीय महामार्गांवर १४ तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर महिलांसह तलावात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन, जलकुंभावर चढून आंदोलन आणि आता सामूहिक अन्नत्याग आंदोलन हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी करण्यात येणारे हे चौथे आंदोलन आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR