नागपूर : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात महिनाभरात २८ मोबाईल प्रयोगशाळा व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोबाईल प्रयोगशाळा विभागनिहाय वितरित केल्या जातील, अशी माहिती अन्न व ओैषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी येथे दिली.
झिरवाळ यांनी शुक्रवारी अन्न व ओैषध प्रशासन विभागातील आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झिरवाळ म्हणाले, अन्न व ओैषध प्रशासन विभाग हे मनुष्याशी निगडीत असलेले अतिशय महत्त्वाचे विभाग आहे. परंतु विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. तब्बल ४० टक्के जागा रिक्त आहेत. तसेच तीनच प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे भेसळप्रकरणी पाहिजे तशी कारवाई करण्यास अडचणी येतात.
आता विभागातील ४० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी कारवाई लवकरच केली जाईल. १९० पदाची भरती एमपीएससीमार्फत केली जात आहे. यासोबतच ३३ लोकांना पदोन्नती सुद्धा देण्यात आल्या आहेत. इतर रिक्त पदेही लवकरच भरली जातील. यासोबतच भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळांची गरज असल्याने मोबाईल प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिनाभरातत्या उपलब्ध होतील. भेसळ प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
अन्न व ओैषध विभागाची नवीन इमारत ही अनेक वर्षांपासून तयार आहे. शुक्रवारी झिरवाळ यांनी या इमारतीची पाहणी सुद्धा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, विभागाची इमारत तयार आहे. या एकाच इमारतीत विभागाशी संबंधित सर्व कार्यालये आणि प्रयोगशाळा राहणार आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेल्या साहित्यासाठी २० कोटीची आणखी गरज आहे. याच अधिवेशनात या निधीचा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच या नवीन इमारतीचे लोकार्पण येत्या एप्रिल महिन्यात होईल, असा दावाही मंत्री नरहळी झिरवाळ यांनी केला.