30.6 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रमुलींच्या जन्मदराचा टक्का वाढला

मुलींच्या जन्मदराचा टक्का वाढला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अनधिकृत गर्भपाताच्या घटना वाढल्या असताना वस्त्रनगरीत मात्र मुलींच्या जन्मदराच्या टक्केवारीत अल्प प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदराचा टक्का अलीकडे अत्यंत कमी होता. मात्र प्रशासनाची जनजागृती, शासनाचे कठोर धोरण यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का आता वाढत चालला आहे. मुलींचा वाढता टक्का हा आशादायी असला तरी मुलांच्या तुलनेत ही टक्केवारी अजूनही वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आणखी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

वंशाला दिवा पाहिजे या मानसिकतेमुळे मुलींच्या जन्माला घरच्यांकडूनच विरोध होत होता. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी असे विदारक चित्र होते. मात्र मुलींची घटती संख्या पालकांसह प्रशासनाची डोकेदुखी बनली होती. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासन स्तरावरच अनेक प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच कठोर कायदेही करण्यात आले. त्याचा परिणाम कालांतराने मुलींचा टक्का वाढण्यात झाला.

इचलकरंजी ही वस्त्रनगरीबरोबरच कामगारनगरी म्हणून परिचित आहे. कामगारांची आर्थिक स्थिती आणि वाढता शैक्षणिक खर्च यामुळे मुली जन्माला येणे त्यांच्यासाठी कठीण समजले जात होते. इच्छा असूनही अनेकवेळा त्यांना जन्म देणे पालकांसाठी शक्य नव्हते. सुशिक्षित आणि आर्थिक सुबत्ता असणा-या कुटुंबांचीही हीच मानसिकता होती. परिणामी स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले होते. मात्र शासनाने स्त्री भ्रूणहत्येविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. प्रसंगी अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. स्त्री भ्रूणहत्येचे रॅकेटही मोडीत काढले. परिणामी स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण घटले.

प्रभावी उपाययोजनांची गरज
शासनाकडून मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाते. शासनाकडून मुलीच्या जन्मानंतर मुलींचे शिक्षण मोफत केले आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम भविष्यात मुलींचे जीवनमान वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने आणखीन प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कारवाई होणे गरजेचे
इचलकरंजी शहरात यापूर्वी गर्भलिंग निदान चाचणी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र प्रशासनाने तातडीने कारवाई केली. शहरातील एक हॉस्पिटल सीलही करण्यात आले होते. त्यामुळे अशा घटनांना पायबंद बसण्यास मोठी मदत झाली आहे. मात्र अद्यापही परिसरातील ग्रामीण भागात तसेच कर्नाटक सीमाभागात अशी चाचणी होत असल्याचे बोलले जाते. त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR