जळगाव : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा आहे हे आता समोर आले आहे. शिवाय तो कुणाचा कार्यकर्ता आहे, हे ही स्पष्ट झाले आहे. याची कबुली त्याच्या नेत्यानेही दिली आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकारचीच कोंडी होण्याची दाट शक्यात आहे.
दरम्यान, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणा-या आरोपीमध्ये पीयूष मोरे, अनिकेत भोई, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे. यातील पीयूष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली आहे. तो नगरसेवकही राहिला आहे. त्याने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचेही सांगितले. मात्र त्याला या प्रकरणात गोवले गेले आहे. ज्यावेळी जत्रेत गोंधळ झाला त्यावेळी सोडवण्यासाठी म्हणून तो तिथे गेला होता. त्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे असेही पाटील म्हणाले.
आरोपी असलेल्या पीयूष मोरेने भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तो भाजपचा नगरसेवकही होता. तो आता माझ्या सोबत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचे नाव जबरदस्तीने टाकले गेले आहे. पीयूष मोरे हा भानगड सोडवण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याचे नाव टाकण्यात आले. तो जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. पण केवळ आरोप करून कुणी दोषी होत नाही, असेही पाटील म्हणाले. जर तो दोषी ठरला तर त्याला फाशी द्या असेही ते म्हणाले. मात्र आधी पाटील यांनी आरोपींचा आपल्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले होते.
या घटनेची थेट दखल आधी मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना अटक केली आहे. उर्वरित लोकांनाही अटक होईल. परंतु त्यांनी अतिशय चुकीचे काम केले आहे. त्यांना अजिबात माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे हे राजकीय टवाळखोर नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचेही उत्तर आता समोर आले आहे.
शिंदे गटाची होणार कोंडी
मात्र हे कार्यकर्ते आता महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाचेच असल्याने एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झाली आहे. त्यात अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार समोर आला आहे. आधीच एकनाथ शिंदे यांच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका फडणवीसांनी लावला आहे. त्यात आता हे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंची कोंडी केल्याचे बोलले जात आहे.