24.2 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रआझाद मैदानावर आंबेडकरी संघटनांचे आंदोलन

आझाद मैदानावर आंबेडकरी संघटनांचे आंदोलन

मंत्रालयाच्या दिशेला जात असतानाच आंदोलकांना रोखले

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या आझाद मैदानावर वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचे आज सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. पण सरकारकडून अद्यापही कोणीही प्रतिनिधी आला नसल्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले.
दरम्यान, परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेले वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात शेकडो आंदोलकांचं आदोलन सुरु आहे.

विशेष म्हणजे मुंबईत आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील लोकप्रतिनिधी आज मुंबईत दाखल झाले आहेत. हे लोकप्रतिनिधी मुंबई आणि मंत्रालयात कामानिमित्त तिथे व्यस्त असावेत. पण दुसरीकडे मुंबईतच आझाद मैदानावर आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या बघायला मिळत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, अशी घोषणा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

सरकारकडून अद्याप कोणीही प्रतिनिधी आंदोलकांसोबत बातचित करण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आंदोलक हे संतप्त झाले आहेत. आंदोलकांचे भर उन्हात आंदोलन सुरु आहे. मुंबईत इतक्या लांब येऊनही सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी आझाद मैदानावरुन थेट मंत्रालयाच्या दिशेला मोर्चा नेण्याचं ठरवलं. पण पोलिसांनी आझाद मैदानाचे गेट बंद केलं. यामुळे आक्रमक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेस नेते आंदोलनस्थळी
आंदोलनामुळे वातावरण तापत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे आंदोलनस्थळी दाखल झाले. विजय वडेट्टीवार हे देखील आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेलं गेट उघडण्याच प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाल्याने आंदोलक गेट उघडण्यात अपयशी ठरले. यावेळी काही आंदोलकांनी गेट चढून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल : विजय वडेट्टीवार
हे सरकार घाबरुन आहे. जनतेचा सामना करु शकत नाही म्हणून पोलिसांना पुढे करुन ते काम करत आहेत. या सरकारला धडा शिकवणार. अधिवेशनात हा प्रश्न मांडू. सरकारला जाब विचारु आणि या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिडे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमच्या सोमनात सूर्यवंशी याचा पोलिसांनी पोलिस कोठडीत केलेला खून आहे. याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल , अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR