मुंबई : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास सरकारने ८० दिवस लावले. निर्घृण हत्याकांडाचे काळीज चिरणारे फोटो पाहिल्यानंतरही सरकारने मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कारण हे सरकार पाषणहृदयी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील साथीदारांना कठोर शासन व्हावे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा ही मागणी तीव्र झाली होती. अशातच हत्याकांडानंतर ८० दिवसांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संतोष देशमुख हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र दाखल करताना अनेक फोटो आणि व्हीडीओ सादर करण्यात आले. या फोटो आणि व्हीडीओची कल्पना सरकारला आधीच होती. किंबहुना, हे सर्व फोटो आणि व्हीडीओ सरकारकडे आधीच होते. पण, हे फोटो-व्हीडीओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही? निर्दयी सरकारच्या हृदयात कालवाकालव कशी झाली नाही? हे सर्व पुरावे असतानाही राजीनामा घेतला गेला नाही. पण, काल (सोमवार, ३ मार्च) रात्री हे फोटो, व्हीडीओ लोकांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, यावरून हे सरकार किती निर्दयी आहे, हे स्पष्ट झाले आहे.