23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रकर्मचा-यांच्या कमतरतेमुळे ससून रुग्णालयाची दुरावस्था

कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे ससून रुग्णालयाची दुरावस्था

रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया त्वरीत सुरू करणार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन पुणे विभागातील आमदारांची बैठक घेणार

मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातल्या ससून रुग्णालयातील ७६९ पदे रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणी वर्गातील जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. कर्मचा-यांची कमतरता असल्यामुळे रुग्णसेवा व स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत असल्याची कबुली, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. डॉक्टरांची तसेच वर्ग एक व दोन मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची पदेही जिल्हाधिका-यांमार्फत लवकरच भरली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

ससून रुग्णालयाच्या दुरावस्थेचा प्रश्न सुनील कांबळे, राहुल कुल, विक्रम पाचपुते, भीमराव तापकीर आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. यावेळी अनेक सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हजारो रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून असताना तेथील स्थिती किती दयनीय आहे याकडे लक्ष वेधले. रुग्णांना औषधे उपलब्ध होत नाहीत. अत्यावश्यक सेवा, शस्त्रक्रिया होत नाहीत. लोकांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जावे लागते. स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे. साधी पिण्याच्या पाण्याचीही तेथे व्यवस्था नाही, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रुग्णालयात औषधांचा तुटवडा नाही. नुकतीच १२ कोटी ९४ लाख रुपयांची औषधे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. उपकरणेही उपलब्ध आहेत. परंतु क्षमतेपेक्षा अधिक रुग्णसंख्या व कर्मचा-यांची कमतरता यामुळे गैरसोय होते अशी कबुली मिसाळ यांनी दिली. ससून रुग्णालयातील २३०० मंजूर पदांपैकी ७६९ पदे रिक्त असल्याचे सांगितले.

परिचारकांची १५६ पदे रिक्त आहेत. ससूनमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या मोठी आहे व दुसरीकडे कर्मचा-यांची कमतरता आहे. रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चतुर्थ श्रेणी वर्गातील ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे जिल्हाधिका-यांमार्फत भरली जातात. त्यामुळे ही पदं तातडीने भरण्याबाबत जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या जातील असे आश्वासन राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.

ससून रुग्णालयातील स्वच्छतेबाबत सर्वच सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. तेव्हा स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले असून काम व्यवस्थित होत नसेल तर या कंत्राटदाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मिसाळ यांनी दिले. तसेच अधिवेशन संपल्यानंतर ससून रुग्णालयात दौरा करून, बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR