अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमध्ये सातत्याने होणारा पराभव आणि पक्ष संघटना वाढीसाठी नेत्यांकडून होणारे दुर्लक्ष यावरून राहुल गांधी चांगलेच संतापल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवारी अहमदाबादच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट मार्ग दिसत नाही अशी जाहीर नाराजी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी म्हटले की, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु स्टेजवरून सांगतो, गुजरातमध्ये काँग्रेसला मार्ग सापडत नाही. गुजरात काँग्रेसमध्ये २ प्रकारचे लोक आहेत. एक ते जे जनतेसमोर उभे आहेत, ज्यांच्या मनात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे असे नेते जे जनतेपासून दूर आहेत. संपर्कात नाहीत, त्यातील काही भाजपाच्या जवळ आहेत. जोपर्यंत आम्ही अशा १५-२० लोकांना वेगळे करत नाही तोपर्यंत गुजरातची जनता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
तसेच गुजरातच्या जनतेला पर्याय हवा, त्यांना बी टीम नको. माझी जबाबदारी या दोन्ही गटातील लोकांना ओळखण्याची आहे. आमच्याकडे बब्बर शेर आहे. जर आपल्याला कठोर कारवाई करावी लागली तरी करणे गरजेचे आहे. १०, १५, २०, ३० नेत्यांना पक्षाबाहेर हाकलायचे झाले तरी केले पाहिजे. भाजपासाठी काँग्रेसमध्ये काम करता, त्यापेक्षा बाहेर जाऊन काम करा. तुम्हाला तिथे जागा होणार नाही, ते तुम्हाला बाहेर फेकून देतील असा खोचक टोलाही राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांना दिला.