इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या नापाक खेळीचा आणखी एक पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने मोठमोठ्या गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांना त्यांचे एजेंट बनवून भारताविरोधात कट रचण्याचा प्रयत्न करत असतात. आयएसआयचा असाच एक म्होरक्या मुफ्ती शाह मीर याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. मुफ्ती शाह मीर याची भारतीय अधिकारी कुलभूषण जाधवच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते.
बलुचिस्तानच्या तुरबत परिसरात राहणा-या मुफ्ती शाह मीर आयएसआयच्या इशा-यावर बेकायदेशीरपणे लोकांना एका स्थानाहून दुस-या ठिकाणी पोहचवण्याचे काम करतो. याचसोबत तो ड्रग्स आणि हत्यारांची तस्करीही करत होता. मुफ्ती शाह मीर पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी ट्रेनिंग सेंटरमध्ये ये-जा करायचा. त्याचे आणखी एक काम होते, तो पाकिस्तानातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचा. मुफ्ती शाह मीरने ‘आयएसआय’च्या सांगण्यावरून अफगाणिस्तानातही त्याचा तळ ठोकला होता. तो स्वत:ला एक दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात वावरायचा आणि गुप्त माहिती पाकिस्तानी फौजेला द्यायचा.
बलूचिस्तान मध्ये सुरू असलेल्या चळवळीत जे पाकिस्तानातून स्वातंत्र्य मागतायेत त्या लोकांची माहिती आयएसआयला द्यायचा. मीर शाहच्या माहितीच्या आधारे अलीकडेच पाकिस्तानी लष्कराने या चळवळीतील नेत्यांवर कारवाई केली होती. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय अशी कारवाई करणे अशक्य होते. पाकिस्तानी सैन्याच्या या कारवाईमुळे चळवळीत मोठी खळबळ माजली होती.
पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईनंतर जेव्हा शोधाशोध सुरू झाली तेव्हा चळवळीतील कार्यकर्त्यांना आपल्यातच कुणीतरी विश्वासघातकी असल्याचे कळले, त्यात मीर शाह नाव पुढे आले. तेव्हापासून मुफ्ती मीर शाह टार्गेटवर होता. मुफ्ती मीर शाह तुरबत परिसरात एका मशिदीतून नमाज पठण करून बाहेर पडणार इतक्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.