मुंबई : प्रतिनिधी
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे दोन खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर , संजय पवार यांनी आज मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात होणारी गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. येणा-या काळातही ही गळती सुरूच राहण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हे दोन्ही माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने पश्चिम उपनगरातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या दोन्ही नगरसेवकांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही माजी नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तुफान हल्ला चढवला.